नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात जिल्हा बाल संरक्षण पथकाने दोन बालविवाह रोखले. डोंगरगाव येथे १५ वर्षीय मुलीचा आणि कन्हान परिसरात १७ वर्षीय मुलीचा विवाह थांबवण्यात आला. दोन्ही मुलींना सुरक्षिततेसाठी बालगृहात हलवण्यात आले. डोंगरगाव येथील प्रकरणात मंडप सजवून ठेवला होता. मुलीला हळद लावण्यात आली होती. पाहुणे येत होते आणि स्वयंपाकही तयार होता. याच वेळी बाल संरक्षण पथकाने कारवाई केली. कन्हान येथील प्रकरणातही मुलीला हळद लावण्यात आली होती. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजीत कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, जिल्हा बाल रक्षक समन्वयक प्रसन्नजीत गायकवाड आणि बाल संरक्षण अधिकारी साधना हटवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने नवी योजना आखली आहे. गावागावांत किशोरवयीन मुलींचे अक्षरा मंच स्थापन करण्यात येत आहेत. जामगड गावातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक मंचात सात ते अकरा मुलींचा समावेश असून त्यात विविध समाज घटकांतील मुलींना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. बालविवाहाची माहिती मिळताच हे मंच पालकांचे समुपदेशन करतील. मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना सक्षम करणे आणि बालविवाहाचे दुष्परिणाम रोखणे हे या मंचाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
