पहलगामधील हल्ला हा देशावरील हल्ला- शरद पवार:संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीलाही पाठिंबा; ठाकरेंच्या एकत्र येण्यावरही भाष्य


पहलगामध्ये झालेला हल्ला हा या देशावरील हल्ला आहे. ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशासाठी दिलेली किंमत आहे. त्यामुळे या ठिकाणी धर्म, जात, पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. भारतीयांवर हल्ला कोणत्याही शक्ती करत असतील, तर देश वासियांना देखील कशाचीही अपेक्षा न करता एकत्र राहावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी धर्म विचारुन हल्ला झाला नसल्याच्या त्या वक्तव्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सहकारी यासंबंधीची उपाययोजना करत आहेत. त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सर्वांचे आहे. त्या संबंधीचेच वक्तव्य आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी केलेले आहे. सर्व पक्ष बैठकीमध्ये आमच्या प्रतिनिधींनी देखील तशीच भूमिका घेतली आहे. त्याच भूमिकेवर आम्ही पुढे जाणार असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ठाणे येथे तुळजाभवानी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, आपण आता पवित्र स्थानी आहोत, त्यामुळे राजकारणावर भाष्य करायला नको, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीला पाठिंबा पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. त्या मागणीला देखील पाठिंबा शरद पवार यांनी दिला आहे. या संदर्भात ते म्हणाले की, विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आमच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. या प्रश्नावर सर्व देश एक आहे, सर्व पक्ष एकत्र आहेत, सर्व नेते एक आहेत, हा संदेश सर्वत्र पाठवण्यासाठी अधिवेशन उपयुक्त ठरेल. असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. ठाकरे एकत्र येत असतील तर आनंदच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनीच संकेत दिले आहेत. यावर देखील शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला. दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र या संबंधित भाष्य करण्याचा सध्या प्रसंग नसल्याचे शरद पवार यांनी म्हणाले.

Leave a Comment