जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव (कान्ह.) च्या वतीने 15 वित्त आयोग अंतर्गत कचरा विलगीकरणाचे काम कान्हळगाव रोडवर सुरू आहे. सदर कामाला ग्राम पंचायत कार्यालय पिंपळगावचे उपसरपंच उमेश रामदास उपरकर व विजय सखाराम चोपकर यांचा विरोध होता. गावातील अंतर्गत राजकारणामुळे सदर कामाला विरोध करीत दोघांनीही दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी कामाच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले होते व पुन्हा काम सुरू केल्यास तोडफोड करण्याची धमकी दिली होती. मात्र सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभने यांच्यासह इतर सदस्यांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही व्यक्तींना ताकीद दिली असता सदर दोन्ही व्यक्ती घटनास्थळ सोडून गेले. नंतर दिनांक 25 एप्रिल 2025 ला सदर प्रकरणी ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव आपली मनमानी करत असल्याचे आरोप करणारे वृत्त उपसरपंच यांनी प्रकाशित केले व त्यानंतर सदर कामाला त्यांचा विरोध सुरूच होता. काल रात्री च्या सुमारास दोघांनीही संगणमत करून सदर कामाची तोडफोड करून कचरा विलगीकरण सेड जमीनदोस्त केले ही घटना काम करणारे मजूर व गावकऱ्यांच्या लक्षात सकाळी सात वाजता निदर्शनात आली. याबाबत गावात चर्चा होऊ लागली व आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मासिक सभेदरम्यान या विषयावर चर्चा सुरू असताना उपसरपंच उमेश रामदास उपरकर व सदस्य विजय सखाराम चोपकर यांनी कबुली देऊन “ते सेड आम्हीच पाडले आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा” अशा प्रकारची धमकी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्यांना दिली. सदर प्रकाराला संतापून ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव व सरपंच यांच्यासह सर्व सदस्यांनी पोलीस स्टेशन आंधळगाव गाठून सदर प्रकरणाची तक्रार केली व या प्रकरणी दोषींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(4) व कलम 351(2) नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यावेळी तक्रार करताना सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभने, सचिव शालिकराम भारत भलावी, सदस्य बादल योगेश चोपकर, छाया देवराम चापरे, शिल्पा गुणवंत चोपकर, नयना राजेंद्र जीभकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
