पुण्यात बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप:ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल : मुरलीधर मोहोळ


महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे. मुलांना ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास भविष्यात संस्कारक्षम पिढी निश्चित घडेल, असा विश्वास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज (दि. 30) सिटी प्राईड, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री मोहोळ बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते अजय पुरकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, निकिता मोघे, केतकी महाजन, विनोद सातव आदी उपस्थित होते. ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषात मुरलीधर मोहोळ यांनी मुलांचा उत्साह वाढवला. ते पुढे म्हणाले, सत्तावीस वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्याचे काम संवाद करत आहे. ही साहित्य, कला आणि सांस्कृतीची सेवा अशीच पुढे चालत राहो. पसायदानाचा अर्थ लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा असा संदेश दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मुलांना दिला. लांजेकरांचे पाच चित्रपट या महोत्सवात मुलांना पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती बाल-कुमारांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संत परंपरा व वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने महोत्सवात पाच ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आले. सत्तावीस वर्षांपासून सातत्याने सुरू असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव बाल चित्रपट महोत्सव आहे, असे सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले.

Leave a Comment