माण तालुक्याच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी तातडीने मिळावे, वर्षातून किमान तीन आवर्तने द्यावीत आणि शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने समान जलवाटप व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज (दि. ३०) म्हसवड (ता. माण) येथे सामाजिक कार्यकर्ते महेश कर्चे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. मोर्चा काढू नये म्हणून ग्राम विकास मंत्र्यांनी बराच दबाव आणल्याचा व फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या महेश कर्चे यांनी केला आहे. त्या संदर्भात त्यांनी मंत्र्यांविरुद्ध तक्रारी अर्जही जिल्हा पोलिस प्रमुख व म्हसवड पोलिस स्टेशनला दिलेला आहे. या मोर्चाची सुरुवात म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. पुढे मोर्चाने शिवाजी चौक, बाजारपेठ, रामुस वेस, एसटी बसस्थानक मार्गे मार्गक्रमण करत येथील अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. यावेळी तारळी सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर आणि चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून जमावबंदी लागू करण्यात आली होती, तसेच आंदोलन रोखण्यासाठी मोठा दबावही आणण्यात आला. तरीही शेतकरी रस्त्यावर उतरले आणि आपला आवाज बुलंद केला. यावेळी बोलताना महेश कर्चे म्हणाले, आम्हाला वर्षभरापासून एकही आवर्तन मिळालेले नाही. शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू असताना, आम्ही प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, पाणी मिळण्याऐवजी धमक्या मिळत आहेत. काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मला फोनवर ‘तू आंदोलन करतोसच कसा? तुझा तुषार खरात करेल’ अशा अर्वाच्य भाषेत धमकी दिली. ही लोकशाहीला काळीमा फासणारी प्रवृत्ती आहे. आमचा लढा न्यायाचा आहे. येत्या दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत, असा इशारा महेश कर्चे यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण माण-खटाव परिसरातच नव्हे तर जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. प्रशासनाचा व मंत्र्यांचा दबाव असूनही शेतकऱ्यांनी धैर्याने आंदोलन उभं केल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांची धमकी काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मला फोन करून ‘तू आंदोलन करतोसच कसा? तुझा तुषार खरात करेल’ अशा अर्वाच्य भाषेत धमकी दिली, असा आरोप महेश कर्चे यांनी केला. हा आमच्या लोकशाही व्यवस्थेवरचा कलंक आहे, असेही ते म्हणाले.
