कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले.
.
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रज्ञा महाजन बोलत होत्या. स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर साहित्यदीप साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, साहित्यदीप प्रतिष्ठानचे संचालक सतीश गयावळ, कवयित्री सुनीता टिल्लू आणि कवयित्री ऋचा कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रज्ञा महाजन म्हणाल्या की, पुण्यातील सांस्कृतिक वातावरण हे फार वेगळ्या उंचीवरचे आहे. इथल्या साहित्य संस्थांमध्ये स्पर्धा नसून एकमेकांच्या हातात हात घालून साहित्य सेवा कशी करता येईल, यासाठी येथील साहित्यसंस्था प्रयत्नशील असतात.
यावेळी बोलताना ऋचा कर्वे म्हणाल्या की, आता सगळे संपते की काय अशा विविध प्रश्नांच्या गर्तेत अडकलेले असताना मला कवितेने हात दिला. मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. त्यातून मी कविता लिहित गेले. माझी कविता मला घडवत गेली आणि कवितेने माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले.
यावेळी बोलताना सुनीता टिल्लू म्हणाल्या की, मला कवितेचे आकर्षण सुरूवातीपासून होतेच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा-वळणांवर कवितेने माझा आणि मी कवितेचा हात कधीच सोडला नाही. मोठमोठ्या साहित्यिकांचे साहित्य वाचल्यामुळे माझ्यावर काव्य वाचनाचे संस्कार माझ्यावर झाले आणि माझ्या काव्यप्रतिभेची व्याप्ती वाढत गेली.
यावेळी सतिश गयावळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री मृणाल जैन यांनी केले. साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांनी आभार मानले. यानिमित्त आयोजित मनांगण या स्वरचित कवितांच्या अनोख्या मैफलीत प्रतिभा पवार, मीनाक्षी नवले, मिलिंद सु. जोशी, संध्या गोळे, अशोक भांबुरे, मीना सातपुते, भालचंद्र कुलकर्णी, वैजयंती आपटे, सुनीता टिल्लू आणि ऋचा कर्वे सहभागी झाल्या होत्या.