छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोर
.
इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे.
काय म्हणाले इंद्रजीत सावंत?
प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास फोनवरून मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने मला दोनवेळा फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पहिला फोन आल्यानंतर मी या प्रकरणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. पण दुसऱ्या फोनमध्ये सदर व्यक्तीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या. जिथे असेल तिथे घरी येऊन बघून घेईन, असे हा व्यक्ती म्हणाला, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले आहे.
इंद्रजीत सावंत यांनी एका फेसबुक पोस्टद्वारेही या प्रकरणी भाष्य केले आहे. ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात श्री शिव छत्रपतींबद्दल काय विष भरलेले आहे, हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डींग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही. जय शिवराय!
जिथे असाल तिथे ब्राह्मणांची ताकद दाखवून देऊ, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. आम्ही तुमच्या घरात घुसून मारू, असेही या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकावयास येत आहे.
‘छावा’वर काय म्हणाले होते सावंत?
विकी कौशल व रश्मिका मंदाना अभिनीत छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारित आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या चित्रपटावर भाष्य करत त्यात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता. छावा सिनेमात इतिहासाचे वेगळ्या पद्धतीने दर्शन झाले आहे. त्यात सोयरा बाईसाहेबांना खलनायक दाखवण्यात आले. मुळात अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते. विकीपिडियावर जो खोटा इतिहास लिहिला जात आहे तो काढून टाकण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.
प्रशांत कोरटकरने फेटाळले आरोप
प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मी इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही. माझ्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा केला असेल. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी 15 वेळा माझे फेसबुक हॅक करण्यात आले. माझा नंबरही यापूर्वी हॅक झाला होता. सावंत यांनी आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करण्याची गरज होती, असे ते म्हणालेत.