अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता.
.
जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गडगडेश्वर मंदिराजवळील कारवाईत महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले. सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना जप्त केला. याशिवाय कर्जदारांकडून घेतलेले ७९ कोरे धनादेश, १०० रुपयांचे तीन कोरे मुद्रांक आणि १० दुचाकींची नोंदणी प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली.
राजेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या पथकाने दुपारी १२.२० ते २.०० या वेळेत कारवाई केली. तर प्रीती धामणे यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या पथकाने आनंदनगर-महाजनपुरा येथे दुपारी १.१५ ते २.१० या वेळेत धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी मात्र कोणतेही संशयास्पद कागदपत्र आढळले नाही.
सहकार विभागाने या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या साहित्याची सखोल चौकशी सुरू केली आहे. अवैध सावकारी रोखण्यासाठी विभागाकडून अशा कारवाया केल्या जात आहेत.