राज्यातील जल जीवन मिशन योजनेद्वारे अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी असून सदर योजनाच कुचकामी ठरली आहे असे म्हणत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. हिंगोलीमधील येथील संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान पत्रकारांनी जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावात नळ योजना झाली मात्र गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगताच, पालकमंत्री झिरवाळ यांनी सदर योजनाच कुचकामी ठरल्याचे त्यांनी सांगितले. सदर योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. केंद्र व राज्यामार्फत हि योजना चालविली जात आहे. मात्र आता या योजनेच्या मापदंडात बदल केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.यावेळी आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती.
रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सुचना दिल्या जातील नरहरी झिरवाळ म्हणाले की, राज्यात सदर योजना राबवितांना आधी उद्भव घेऊन त्याला पाणी लागल्यानंतरच इतर कामे करणे अपेक्षीत आहे. त्यासाठी पैसे जास्त खर्च करावे लागतील. उद्भव लांब असून चार योजना तयार करूनही पाणी मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग. त्यासाठी कंत्राटदारावर किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा योजना राबविण्याच्या मापदंडातच चुका आहेत हे योजनेचे अपयश असल्याची कबुली त्यांनी दिली. या योजनेच्या सुधारणेसाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला कळविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील रिक्तपदांच्या प्रश्नावर त्यांनी सदर पदे तातडीने भरण्याबाबत सुचना दिल्या जातील असे सांगितले. तर हिंगोली जिल्ह्यात टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने टँकर सुरु करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
