भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. प
.
तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाते. गृहराज्यमंत्री योगेश कदम घटना घडल्यानंतर 50 तासांनी येथे आलेत. आम्हाला त्यांना राज्यात काय चाललंय याचा जाब विचारायचा होता. भेटायचे होते. यासाठी आम्ही त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. दत्तात्रय गाडेसारखा साधा आरोपी सापडत नाही. ही कसली यंत्रणा आहे? त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाही करण्यात आले आहे.
महिला रात्रभर झोपल्या नाहीत
पोलिसांना लाखोंचा पगार मिळतो. फुकट मिळतो. पोलिस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे. राजकीय दबावामुळे अशी अनेक प्रकरणे दाबण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण घ्या. वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला. आता या प्रकरणातही आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट पाहिली जात आहे का? रात्रभर महिला झोपल्या नाहीत. आज सगळ्या महिला आहेत. मुले-मुली आहेत. सर्वजण घाबरलेत. महिला एसटीमध्ये सुरक्षित प्रवास करतात. पण एसटीही आता सुरक्षित राहिली नाही.
योगेश कदम कोणत्या तोंडाने येथे आलेत
मंत्री योगेश कदम यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला पोलिस जबरदस्तीने ओढून आणतात. तसे आरोपीलाही ओढून आणा. अन्यथा आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमचा निकाल लावू. मध्यवर्ती भागातून आरोपी पळून जातो की पळवून लावला जातो? वाल्मीक कराड सरेंडर होणार अशा बातम्या आल्या होत्या. गृह राज्यमंत्री योगेश कदम इथे कोणत्या तोंडाने आलेत. त्यांनी आरोपीला घेऊन यावे. हे पुणे पोलिसांचे अपयश आहे. इथे कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत. पोलिस यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे.
पालकमंत्री अजित पवार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची भाषा करतात. आम्हा सर्वांची हीच मागणी आहे. त्यांचे बारामतीचे बसस्थान कुठे आणि आमचे स्वारगेट बसस्थानक कुठे. गाड्या बंद पडल्यात. त्यात कंडोमची पाकिटे पडलेत. साड्या पडल्यात. मटक्याचे आकडे चालतात. आम्ही आतापर्यंत अनेकदा हा विषय मांडला. पण अशी वेळ आली की रस्त्यावर उतरावे लागते. महिलांबाबत असे घडत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल, असेही तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या.
आरोपी दत्तात्रय गाडेवर 1 लाखांचे बक्षीस
पोलिसांच्या माहितीनुसार, बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथके तैनात करण्यात आलीत. पुणे पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. विशेषतः पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.