छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केले आहे. तर राज्यात अन् देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
.
दरम्यान अबू आझमी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्या काळातच भारताला सोन्याची खान म्हणून संबोधले जात होते. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेमके काय म्हटले
अबू आझमींनी म्हटलंय की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.
मुस्लिमांवरील अन्याय दिसत नाही?
अबू आझमी म्हणाले की, मी दररोज सकाळी पाहतो की मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी कट रचले जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मुस्लिमांवर होणारा अन्याय पाहू शकत नाहीत का? जर समाजातील 20 टक्के लोकांसोबत हे घडत असेल तर ते अजिबात बरोबर नाही. जर तुम्ही त्यांना आरक्षण दिले नाही, त्यांना रोजगार दिला नाही तर ते कुठे जातील? ते हिंदू सणांमध्ये वस्तू विकतात म्हणून तुम्ही म्हणता की ते दारू विकतात. हे चुकीचे आहे. द्वेषाची ही परंपरा थांबवा.
दोन वर्षांपूर्वीही आझमींकडून औरंगजेबाचे समर्थन
दोन वर्षांपूर्वी बोलताना अबू आझमींनी बोलताना म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाज करतो त्याहून अधिक मुस्लीम समाज करतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात मुस्लिमांसाठी खूप काही केले. 40 टक्के मुस्लीम त्यांच्याजवळ होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लीम होते. ही लढाई धर्माची नव्हती तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी देणेघेणे नव्हते. मी औरंगजेब रहमतुल्ला अलैहच्या साथीला आहे. त्याचा इतिहास जाणून घेतला तर तुम्हाला हे लक्षात येईल की औरंगजेब धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने अफगाणिस्तान पासून बर्मापर्यंत आपले राज्य फैलावले. अनेक हिंदू –मुस्लिम राजांनी सत्तेसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. पण आज त्याला धार्मिक रंग दिला जात आहे आणि त्यामध्ये गोदी मीडिया कारणीभूत आहे.