गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या साथीदाराने १ लाख १० हजार रुपयांची लाच घेतली
.
हिरडपुरीतील फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने १० दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला १ लाख ५० हजार रुपयांचा दंड आणि आरटीओचा ३५ हजार रुपयांचा दंड भरावा लागला. तरीही तिघांनी हायवा सोडण्यासाठी ३ लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर २ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील ९० हजार रुपये आठ दिवसांपूर्वी देण्यात आले होते. तर उर्वरित १ लाख १० हजार रुपये सोमवारी देण्याचे ठरले होते. हे पैसे घेताना दोघे जाळ्यात अडकले. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची प्रक्रिया सुरु होती.
यापूर्वी २ तहसीलदार जाळ्यात
यापूर्वी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि त्याआधीचे तहसीलदार महेश सावंत हे देखील वाळू प्रकरणात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकले होते. त्यामुळे आताची महसूल विभागातीलच माेठ्या अधिकाऱ्यावर कारवाईची ही तिसरी वेळ आहे.
मोबाईलमध्ये लाचखोरांची यादी
ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याच्या साथीदाराचा मोबाईल पथकाने तपासला. त्यात महसूल विभागातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे आढळली. त्यात कोणत्या अधिकाऱ्याला वाळूचा किती हप्ता जातो याची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.