अभिजात मराठी भाषा गौरव दिन पैठणच्या तीर्थखांब येथे साजरा झाला. इतिहास अभ्यासक जयवंत पाटील आणि संतोष गव्हाणे यांनी पैठणच्या मराठी भाषेतील महत्त्वावर प्रकाश टाकला. गाथा सप्तशती, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि तुकाराम गाथा या ग्रंथांचे पूजन क
.
पैठणमध्ये मराठी भाषा गौरव स्मारक स्थापन करण्याची मागणी जयवंत पाटील यांनी केली. सातवाहन काळातील गाथा सप्तशती, बृहत कथा, बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि पंधराव्या शतकातील एकनाथी भागवत या ग्रंथांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. महानुभाव पंथाच्या महदंबेचे धवळे, जैन संत चिमणा पंडित यांचे साहित्य, कवी अमृतराय महाराज यांच्या गझला आणि कृष्णदयार्णव यांचा भागवतावरील ग्रंथ यांची निर्मिती पैठणमध्ये झाली. त्यामुळे मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने पैठणचा मोठा वाटा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी येथे अभ्यास केंद्र उभारावे, अशी मागणी प्रा. संतोष गव्हाणे यांनी केली. मराठीचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सातवाहन राजा हाल यांनी संपादित केलेली गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा असल्याने मराठी भाषा अभिजात ठरली आहे. मराठीच्या विकासात पैठणचे योगदान मोठे असल्याचे जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात दीपाली सव्वाशे, ज्ञानेश्वरी करंडे, अभिजित पवार आणि सचिन करंडे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आणि चक्रधर स्वामी यांच्या ग्रंथांचे पूजन झाले. दिनेश पारीख, बजरंग काळे, संतोष तांबे, जालिंदर येवले, हर्षवर्धन पाटील आणि प्रकाश लोखंडे यांनी भाषणे केली.
पैठणच्या संतपीठाच्या विकासाचे काम थांबल्याने शासनाने आगामी अर्थसंकल्पात भरीव निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.