पोलिस ठाण्यांमधून नागरीकांनी तक्रार दिल्यानंतर त्यावर काय कारवाई केली जाते याची माहिती अनेक वेळा मिळत नाही, त्यामुळे तक्रारदारांना थेट वरिष्ठ कार्यालयात धाव घ्यावी लागते यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोक
.
हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे असून या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे ७०० पेक्षा अधिक गावे येतात. अनेक गावांतून गावकरी त्यांच्या समस्या मांडत असतात. पोलिस विभागाशी संबंधित असलेल्या समस्या व तक्रारींमध्ये प्रामुख्याने गावातील अवैध व्यवसाय बंद करणे, बेकायदेशीर दारु विक्री तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी लागणारी मदत, गावातील आपसातील किरकोळ स्वरुपाचे वादा याचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामीण भागतील गावकऱ्यांकडून या बाबतचे निवेदन व तक्रारअर्ज पोलिस ठाण्यांकडे दिले जातात. मात्र त्यावर पुन्हा काय कारवाई करण्यात आली याची माहिती तक्रारदारांना मिळत नाही. त्यामुळे बहुतांश तक्रारदार वरिष्ठ कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रार देतात. त्यासाठी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून प्रवासाचा आर्थिक फटका व वेळही वाया जातो.
सदर प्रकार लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दर शनिवारी तक्रार निर्गती मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंगोली शहर, वसमत व औंढा नागनाथ येथे तक्रारदारांना बोलावून त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई केली त्याची माहिती तक्रारदारांना दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
तीन ठिकाणी होणार तक्रार अर्ज निर्गती मेळावा
हिंगोली शहर येथे पोलिस अधिक्षक कोकाटे, वमसत शहर येथे अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील व औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात उपाधिक्षक सुरेश दळवे उपस्थित राहतील. हिंगोली शहर पोलिस ठाण्यात हिंगोली शहर, बासंबा, कळमनुरी हद्दीतील तक्रारदारांना उपस्थित राहता येईल. वसमत येथे वसमत शहर, वसमत ग्रामीण, कुरुंदा, आखाडा बाळापूर, हट्टा तर औंढा नागनाथ येथे औंंढा नागनाथ, हिंगोली ग्रामीण, सेनगाव, गोरेगाव, नर्सी नामदेव ठाण्यांतर्गत तक्रारदारांना उपस्थित राहता येईल.