अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती.
.
प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत गटांनी तयार केलेले मसाल्याचे पदार्थ, कडधान्ये, शेव-चिवडा, शेवया, मूगवड्या आणि गृहोपयोगी वस्तूंचीही विक्री केली.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके आणि प्रवीण तायडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पी.आर.पोटे पाटील कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल पथनाट्याद्वारे जनजागृती केली.
धनलक्ष्मी आणि महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गटांच्या स्टॉलवर रोडगे आणि झुणका भाकरीला भेट देणाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आत्माच्या जिल्हा समन्वयक अर्चना निस्ताने यांच्या मते, या प्रदर्शनीमुळे शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली.