कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार
.
याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील बाबूराव शिखरे (३५) याने त्याचा १४ वर्षाचा मुलगा वैभव यास ता. २८ डिसेंबर २०१८ रोजी रात्री झोपेतून उठवून ॲटोने कुंभारवाडी शिवारात नेले. त्या ठिकाणी तु नेहमीच आईची बाजू घेतो याचा राग धरून त्याने वैभव याचा दोरीने गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर त्याला पुन्हा ॲटोने येडशी येथे आणून गावातील अरविंद शिखरे यांच्या घरासमोरील पायऱ्यावर टाकून दिले. त्यानंतर या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, व्हि. एम. केंद्रे यांच्या पथकाने अधिक माहिती घेण्यास सुरवात केली.
यामध्ये वैभव याचा त्याचे वडिल बाबुराव यानेच खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी बाबुराव याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी अधिक तपास करून हिंगोलीच्या अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बाबुराव शिखरे यास आजन्म कारवास व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अॅड. मुटकुळे यांनी बाजू मांडली त्यांना सरकारी वकिल ॲड. एस. डी. कुटे, ॲड. एस. एस देशमुख यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार टी. एस. गुहाडे, महिला कर्मचारी सुनीला धवने यांनी काम पाहिले.
न्यायिक जिल्ह्यानंतर पहिलाच निकाल
हिंगोली जिल्हा न्यायिक जिल्हा म्हणून ता. २२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यानंतर नवीन इमारतीमध्ये खूनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाच्या शिक्षेचा पहिलाच निर्णय आहे. या प्रकरणात वैद्यकिय अधिकारी व तपासीक अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली आहे.