संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे.
.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील चेतन खापरे, फाईन आर्टमधील प्रगती सुधा, पाश्चिमात्य वाद्य संगीतातील प्रथमेश अडालगे आणि सुगम संगीतातील मोहम्मद अबरार मो. साबीर यांचा समावेश आहे. या चौघांनी गुजरातमधील गणपत विद्यापीठात झालेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्यांनी चार पारितोषिके पटकावली होती.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. विद्यार्थी विकास विभागाच्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवातून अनेक प्राविण्यप्राप्त विद्यार्थी घडत असल्याचे त्यांनी सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्यासह विद्यापीठाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.