भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ही युद्धनौका ताब्यात घेतली आहे. विजयदुर्ग खाडीत ही नौका बुडवून देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारले जाणार आहे.
.
आयएनएस गुलदारने ३० डिसेंबर १९८५ पासून नौदलात सेवा बजावली. १२ जानेवारी २०२५ रोजी ४० वर्षांची सेवा पूर्ण करून ही नौका निवृत्त होणार आहे. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले की, युद्धनौकेला शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल.
पर्यटकांना दोन पद्धतींनी या युद्धनौकेचे दर्शन घेता येणार आहे. प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या मदतीने पाण्याखाली जाऊन नौका पाहता येईल. स्कुबा डायव्हिंगची भीती असणाऱ्यांसाठी एमटीडीसी पाणबुडीची सोय करणार आहे.
विजयदुर्गची निवड अनेक कारणांमुळे करण्यात आली आहे. मराठ्यांच्या काळात १०५ वर्षे हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. येथील वाघवटं खाडी ४२ किलोमीटर लांब आणि ४०-५० मीटर खोल आहे. दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ही खाडी नौकांसाठी सुरक्षित मानली जाते.
आयएनएस गुलदार ही लँडिंग शिप टँक श्रेणीतील युद्धनौका आहे. १२०० टन वजन, ८१ मीटर लांबी आणि १० मीटर रुंदी असलेली ही नौका १५० पेक्षा अधिक सैनिक, रणगाडे, तोफा आणि ट्रक वाहून नेण्यास सक्षम होती. या नौकेवर ६ अधिकारी आणि ८५ खलाशी कार्यरत होते.