मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
.
पुणे शहरातून दुचाकी चाेरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी एका अल्पवयीनाकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी साईकुमार कारके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने चोरी केल्याची माहिती दिली. मुलाकडे चौकशी करण्यात आली. अल्पवयीनाने आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
त्याने सिंहगड रस्ता, फरासखाना, पर्वती आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस कर्मचारी अमित गद्रे, अजित शिंदे, साईकुमार कारके, प्रदीप राठोड, गणेश ढगे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे यांनी ही कारवाई केली.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलांची २२ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी दोन महिलांची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विमाननगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. जानेवारी महिन्यात तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. महिलेने सुरुवातीला काही रक्कम चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात जमा केली. चोरट्याने त्यांना सुरुवातीला परतावा दिला. त्यानंतर शेअर बाजारातील विविध योजनांविषयी महिलेला माहिती देऊन आणखी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. परतावा मिळाल्याने महिलेने आणखी रक्कम गुंतविली. दोन महिन्यात महिलेने चोरट्याच्या खात्यात १७ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी पुढील तपास करत आहेत.