बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याचा दावा करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे सत्
.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भुमिकेवर सवाल उठवणारे अहवालातील दोन परिच्छेद कसे वगळले जाऊ शकतात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे सत्र न्यायालयाला केला आहे. तसेच हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे याची ठाणे सत्र न्यायाधीशांना कल्पना दिली होती का? असाही प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. तसेच 5 मार्च रोजीच्या सुनावणीमध्ये राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात अक्षय शिंदे एन्काऊंटर बनावट असल्याचा निर्वाळा देत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच सीआयडी चौकशी सुरू असल्याने संबंधित पोलिसांवर गुन्हा नोंदवला नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात जेष्ठ वकील मंजुला राव यांची अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने बनावट एन्काऊंटरप्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही? असा सवाल विचारला होता. यावर या प्रकरणाची सीआयडीकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला.
अहवालात काय म्हटले आहे?
बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचे न्यायालयीन समितीने अहवालात म्हटले आहे. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.