शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीझबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हेंवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नीलम गोऱ्हे यांची बाजू घेतली
.
नीलम गोऱ्हे यांनी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. उद्धव सेनेत 2 मर्सिडीझ दिल्या, तर एक पद मिळते, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ठाकरे गट आक्रमक झाला असून नीलम गोऱ्हे यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेट अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. नीलम गोऱ्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले नीतेश राणे? नीतेश राणे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत नीलम गोऱ्हे आणि संजय राऊतांच्या विधानाबाबत भाष्य केले. आजपर्यंत आलेल्या अनुभवाने मी सांगतो. आमचे वडील 39 वर्षे शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. हॉटेलचे बीलही ते देत नाही. घरातला एसीही व्हिडिओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती, असा दावा नीतेश राणे यांनी केला. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही. तुम्हाला मी दुकानाचे नावही देऊ शकतो, असेही नीतेश राणे म्हणाले.
संजय राऊत हे स्वत: मारुती मागतात नीतेश राणे यांनी संजय राऊत यांच्या विधानाचाही समाचार घेतला. संजय राऊतांचे महिलांबद्दल काय विचार आहेत याबद्दल कधीतरी डॉ. स्वप्ना पाटकरला विचारा. आपण पूर्ण महाराष्ट्राने हे ऐकलेले आहे. मुळात संजय राऊतांना नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य दुखणारच. कारण उद्धव ठाकरे जर मर्सिडीझ घेत असतील, तर संजय राऊत हे स्वत: मारुती मागतात. त्यामुळे त्यांना झोंबणारच. मालकाला मर्सिडीझ द्या आणि नोकराला मारुती कार द्या. ते त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांना हे झोंबणारच, अशी टीका नीतेश राणे यांनी केली.
नीलम गोऱ्हे जे बोलल्या, ते योग्य आहे नीतेश राणे पुढे म्हणाले, संजय राऊतांना मला सांगायचे की मालकाचे वस्त्रहरण करायचे असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे आणि माझ्या बाजूला बस. आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे, जेवण कुठून येतो हे सांगतो. आताही उद्धव ठाकरेंच्या घराची लाँड्री ही लीला हॉटेलमधून केली जाते. त्यावर यादव हे नाव दिले जाते. त्याची मी रिसिट दाखवू शकतो. आताही त्यांच्या घरात जे सँडविच जातात ते ट्रायडेंट हॉटेलमधून जातात. त्यामुळे संजय राऊतांनी मला तोंड उघडायला लावू नये. नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या आहेत, ते योग्य आहे. जर अजून तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करायचे असेल तर बोलत राहा. आम्ही अजून माहिती देत राहू, असा घणाघात नीतेश राणे यांनी केला.