नागपूरच्या एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी महिला सुरक्षेसाठी अभिनव शोध लावला आहे. त्यांनी विकसित केलेल्या स्मार्ट पादत्राणांना पेटंट मिळाले आहे.
.
या पादत्राणांमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम आणि जीएसएम सिस्टीम बसवण्यात आले आहे. पादत्राणांच्या तळव्यात अंगठ्याखाली प्रेशर सेन्सर बसवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत या सेन्सरद्वारे पोलिस, रुग्णवाहिका आणि कुटुंबीयांना तात्काळ संदेश जाईल. जीपीएस सिस्टीममुळे पीडित व्यक्तीचे नेमके स्थान कळू शकेल.
प्रा. पेठे यांनी हे तंत्रज्ञान व्यंकट रेड्डी, आर्यन सिंह, ईशा मानवटकर आणि विशाल टिकले या विद्यार्थ्यांच्या मदतीने विकसित केले. पेटंट मिळाल्यानंतर विविध कंपन्यांशी करार करून हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय, प्रा. पेठे यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठीही एक नवीन तंत्र विकसित केले आहे. फास्टॅगमध्ये ट्रॅकर बसवून प्रत्येक ५० किलोमीटरनंतर चालकाला सतर्क करणारी यंत्रणा विकसित केली आहे. १५० किलोमीटर प्रवासानंतर वाहन न थांबवल्यास फास्टॅगमधून थेट दंड वसूल केला जाईल. या तंत्रज्ञानासाठी पेटंटचा अर्ज दाखल करण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
