अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले.
.
खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर टीका केली. सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलकांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये उत्पादन खर्चानुसार शेतमालाला भाव, कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान यांचा समावेश आहे. मेळघाटातील रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे रखडलेले वेतन तात्काळ देण्याची मागणीही करण्यात आली.
२०२४-२५ मधील सोयाबीन पिकाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, सोयाबीन, तूर, कापूस, चना या पिकांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम त्वरित देण्याची आणि कृषीपंपांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली.