Pune Swargate Rape Case Update Shivshahi Bus Moved | Dattatray Gade | स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली: खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने गटाने बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे.

.

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ माजली होती. या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी बुधवारी स्वारगेट बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली होती. त्यामुळे संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रशासनाने घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे.

पोलिसांकडून बसच्या ठावठिकाण्याविषयी गुप्तता

यासंबंधीच्या माहितीनुसार, स्वारगेट बसस्थानक परिसरात उभी असणारी शिवशाही बस काही जणांकडून फोडण्याचे प्रयत्न झालेत. या बसमध्ये घटनेशी संबंधित अनेक पुरावे असण्याची शक्यता आहे. ते या प्रकरणात महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही बस इतरत्र हलवण्यात आली आहे. पोलिसांकडून या बसच्या ठावठिकाण्याविषयी गुप्तता पाळण्यात येत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे पोलिसांनी पीडित तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पायातील एक बूट आढळला आहे. तो त्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन स्वारगेट बसस्थानक परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरापर्यंत दत्तात्र गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणीची चौकशी केली. त्यातूनही पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली आहे.

आरोपीकडे मोबाईल नसल्याने लोकेशन ट्रॅक करण्यात अडचणी

दुसरीकडे, आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे बसस्थानकातून पळून गेला. त्यानंतर तो पुणे किंवा शिरुर येथील आपल्या घरी गेला नाही. पोलिसांनी यासंबंधी त्याच्या भावाची कसून चौकशी केली. त्यात त्याने तो घरी आला नसल्याचे सांगितले. आरोपीकडे मोबाईल फोनही नाही. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय रामदास गाडे एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी सुरुवातीला 8 तपास पथके नियुक्त करण्यात आली होती. हा आकडा आता 13 वर पोहोचला आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचीही घोषणा केली आहे.

Leave a Comment