सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘उत्कर्ष २०२५’च्या सर्वसाधारण विजेतेपदावर पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली. पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ शिंदे हा यंदाच्या ‘उत्कर्ष’चा ‘गोल्डन बॉय’ ठरला, तर पुणे विद्यापीठाचीच अंजली जाधव हिने ‘गोल्डन गर्ल’चा किताब पटकावला
.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने यंदा विद्यापीठामध्ये १५ व्या ‘उत्कर्ष’ सामाजिक-सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य आणि ललित कला यांसह पथसंचलन आणि कार्यप्रसिद्धी अहवाल या विभागांमधील एकूण १३ कलाप्रकारांमध्ये राज्यभरातून आलेल्या २७१ कलाकारांनी आपली कला सादर केली. गेले तीन दिवस विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, संत नामदेव सभागृह, इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुल सभागृह आणि पोतदार संकुल या ठिकाणी झालेला विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणाच्या आधारे या स्पर्धांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यातून याही स्पर्धेतील पुणे विद्यापीठाचा दबदबा निर्विवादपणे सिद्ध झाला.
विद्यापीठाच्या इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलामध्ये कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, डॉ. संदीप पालवे, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे यांनी या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत, त्या आधारे राज्यभरातील स्वयंसेवकांनी वैयक्तिक तसेच सामाजिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तर, अशा स्पर्धांमधून सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी या पुढील काळात देशाचे सांस्कृतिक दूत म्हणून जबाबदारी उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.