ज्यांना गती कळते त्यांनाच प्रगतीचा खरा अर्थ कळतो, सती मनकर्णिकामाता पारनेरकर विद्यालयाची प्रगती झाली, कारण आपण गतीमान राहिलो आहोत, पुढील काळातही आपणाला मोठी प्रगती करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पूर्णवाद भूषण ग
.
हिंगणी येथील सती मनकर्णिकामाता पारनेरकर विद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पूर्णाचार्य आनंद मुठाळ, संस्थेचे अध्यक्ष अनिल भोरे, सचिव महेश गंगावणे, भास्कर देशमुख, सुजाता देशपांडे, सुनील देशपांडे, सुनील जामकर, आशिष आबोटी, मुख्याध्यापक विष्णू घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना गुणेशदादा पारनेरकर म्हणाले की, ज्यांना मुहूर्त साधायचा असतो त्यांना गती ठेवावी लागते. प. पूज्य पूर्णवाद वर्धिष्णू विष्णू महाराज पारनेरकर यांना प्रत्येकाची गती माहिती होती. माणसाची प्रगती कशी साधायची हे माहिती होते. त्यांनी आपल्याला वेगळी गती दिली आहे. शाळे सोबतच विद्यार्थी मोठे करण्याचे काम त्यांना करायचे होते त्यामुळेच त्यांनी ग्रामीण भागात शाळा सुरु केल्याचे त्यांनी सांगतिले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाळा उभारल्या. आजच्या काळात माणसे मोठी होत आहेत पण ती शहाणी होत आहे की नाही हा प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले.
माणसाच्या प्रगतीसाठी आपल्या गतीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. कुठे थांबायचे व कुठे थांबायचे नाही हे त्याला कळले तोच प्रगती करू शकतो. आपण सर्वजण गतीमान राहिलो म्हणूनच हिंंगणी येथील शाळेची प्रगती झाली असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्यांनी केलेले काम हे आपल्याला काम वाटत नाही, मात्र कामाच्या बाबतीत नेहमीच लक्षात ठेवा एकट्याच्या प्रयत्नाने काम होत नाही तर सर्वांनी एकत्र येऊनच काम करायचे असते. कार्याला प्रगतीवर नेण्यासाठी गती साधणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन अंजली अबोटी यांनी केले तर विष्णू घुगे यांनी आभार मानले.