स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी भोवणार असल्याचे दिसत आहे. सावकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान र
.
राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी सुनावणीला हजर राहून जामीन घेणे अपेक्षित होते. परंतु, आज राहुल गांधी यांनी उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण त्यांचे वकील जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र जामीन घेण्यासाठी राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे अशी मागणी अर्जदारांनी केली. ती मान्य करण्यात आली.
कायमस्वरुपी सवलत मिळवण्याची ही वेळ नाही. प्रथम जामीन होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होऊ शकत नाही, प्रत्यक्ष हजर राहून जामीन घ्यावा लागेल, असे मुद्दे ॲड. पिंगळे यांनी मांडले. न्यायालयाने ही बाब मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी नऊ मे रोजी होणार असल्याचे वकिलांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयासमोर सर्वजण समान असल्याचे मत ही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी सुनावणीला राहुल गांधी स्वत: हजर राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील काय म्हणाले? आज 1 मार्च रोजी सावरकर अपमानास्पद विधानाप्रकरणी सुनावणी होती. यावेळी राहुल गांधी यांनी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र राहुल गांधी त्यांच्या वकिलांमार्फत हजर राहिले. त्यामुळे आता यापुढील सुनावणीवेळी राहुल गांधींनी ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष कोर्टात येऊन आपली बाजू मांडावी असे आदेश त्यांना कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी याबाबत बोलताना दिली आहे.
काय आहे नेमके प्रकरण? भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी हिंगोली येथील सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सावरकरांबाबतच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर टीकाही केली होती. राहुल गांधी यांच्या विधानाने भावना दुखावल्याने सावरकरप्रेमी आणि निर्भया फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली.