दिवाळी अंक आणि मराठीचे वाचन याबाबत फारसे आशावादी राहता येत नाही. मराठी भाषेविषयी ची संवेदना विरळ होत चालली आहे की काय आणि ममत्व कमी होत चालले आहे की काय अशी शंका यावी, अशी परिस्थिती सभोवताली दिसत असताना सध्या सभोवताली वैचारिक गारठा निर्माण झाला आहे,
.
पुण्यभूषण फाउंडेशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जनस्थान पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर पत्रकार राजीव खांडेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, पुण्यभूषण फौंडेशनचे संयोजक संजय भास्कर जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंकाचा’ पुरस्कार संपादक अरुण शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. रु. ५१ हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर पुण्यभूषण उत्कृष्ट ‘बालकुमार’ दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘साधना बालकुमार’ या दिवाळी अंकाला, एकाच विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकासाठीचा पुरस्कार ‘वास्तव’ (भूत विशेषांक) या दिवाळी अंकाला तर इतर विभागातील पुरस्कार ‘आर्याबाग’ या दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रु. १५ हजार आणि सन्मानपत्र असे उत्कृष्ट दिवाळी अंकांसाठीच्या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सतीश आळेकर म्हणाले की, मराठी नाटकांच्या बाबातीत मी प्रचंड आशावादी असून ध्वनीयोजना, प्रकाश योजना, सादरीकरण आणि मग शब्द अशा क्रमाने तरूण पिढी नवीन प्रयोग करीत रंगभूमीवर येत आहे. कोणत्याही प्रकारच्या छापील माध्यमांचा उपयोग न करता यांचे सगळे शो हाऊस फुल असतात, यावरून यांची संवादाची माध्यमे आणि संवाद शैली बदललेली आहे, असे दिसून येते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, दिवाळी अंक हे वर्तमानाला भिडणारे सशक्त व्यासपीठ आहे. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यात आलेल्या सर्व नव्या प्रवाहाना सामावून घेतले आणि पुढे त्या प्रवाहांचेच स्वतंत्र दिवाळी अंक निघाले. दिवाळी अंकांमुळे साहित्य निर्मितीला मोठी चालना मिळाली. आज समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातील दरी रुंदावत असून त्यामुळे निर्माण झालेले सांस्कृतिक मांद्य हा चिंतेचा विषय आहे. एकीकडे भौतिक समृद्धी येत असताना दुसरीकडे किळसवाणे सांस्कृतिक दारिद्र्य वाढते आहे अशा काळात दिवाळी अंकांचे महत्व अनन्य साधारण आहे.