मुंबईतील माहीम मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवेसेनेचे माजी आमदार सदासरवणकर यांनी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांच्या आमदारकीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
.
आमदार महेश सावंत यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका सरवणकरांनी दाखल केली आहे. या याचिकेवर 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सदा सरवणकरांनी याचिकेतून केला आहे.
नेमके सरवणकरांचे म्हणणे काय?
सदा सरवणकर यांनी आमदार महेश सावंत यांच्याविरोधात केलेल्या याचिकेत गुन्ह्याची नोंद नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. सरवणकारांच्या मते आमदार महेश सावंत यांनी जनतेची दिशाभूल करुन प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती दिली नाही.
माहीममध्ये रंगली तिरंगी निवडणूक
माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, शिवसेनेचे सदा सरवणकर आणि उद्धवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यासह अमित ठाकरेंचा पराभव केला. यात सदा सरवणकर दुसऱ्या तर अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी फेकल्या गेले होते. अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1 हजार 340 मतांनी पराभव केला.
कोण आहेत महेश सावंत ?
महेश सावंत प्रभादेवीमधील जुने शिवसैनिक आहेत. महेश सावंत यांनी 1990 पासून शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली. सध्या शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांची प्रभादेवी भागावर पकड होती. महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, वर्ष 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदेश बांदेकरांना उमेदवारी जाहीर केली आणि सदा सरवणकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. काही वर्षांनी सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आले तेव्हा महेश सावंत देखील शिवसेनेत परतले. प्रभादेवी परिसरातील सामाजिक कार्यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या महेश सावंत यांनी मागच्या 20 ते 25 वर्षांमध्ये त्यांनी सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख विभागप्रमुख अशी राजकीय वाटचाल केली आहे. 2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात मतभेद झाले. 2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यानंतर महेश सावंत यांनी माहिममधील विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर महेश सावंत हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झाले होते. तसेच 2022 मध्ये पक्षात पडलेल्या फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली होती. तसेच विभागप्रमुखपद सांभाळत असताना त्यांनी माहिम परिसरात ठाकरे गटाची बांधणी केली. यानंतर 2024 मध्ये त्यांना सरवणकर यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले.