Shri Guruji Award announced for Goyal Rural Development Institute and hockey player P.R. Sreejesh | श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर: गोयल ग्रामीण विकास संस्था आणि हॉकीपटू पी.आर. श्रीजेश यांची निवड – Pune News

राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. प

.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरुजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा ३० वे वर्ष आहे. ‘जनकल्याण समिती’चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. संस्थेचे कार्यवाह प्रमोद गोर्‍हे यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे. या पुरस्कारासाठी यंदा कृषी आणि क्रीडा ही क्षेत्र निश्चित करण्यात आली होती, असे डॉ. मराठे यांनी सांगितले.संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.

राजस्थानातील कोटा येथील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ने गो-आधारित जैविक कृषी विकासासाठी भऱीव कार्य केले असून स्वदेशी बीज बँकेचा संस्थेचा प्रयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. प्राचीन आणि पारंपरिक कृषी पद्धतीचे संशोधनही या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. देशातील पहिले सेंद्रिय शेती संशोधन केंद्र या संस्थेने सुरू केले आहे. शेतीच्या क्षेत्रातील अनेक यशस्वी प्रयोग ही संस्था सातत्याने करत आहे.

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांनी स्वकर्तृत्त्वाने क्रीडा क्षेत्रावर त्यांची मोहोर उमटवली असून भारतीय हॉकी संघाचे कप्तान म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०१७ मध्ये ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले, तसेच यंदा त्यांच्या कामगिरीचा गौरव पद्मभूषण पुरस्काराने करण्यात आला आहे. सन २०२० आणि सन २०२४ च्या अॉलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून देण्यात त्यांनी गोलरक्षक म्हणून केलेली कामगिरी मोलाची ठरली. अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत.

Leave a Comment