श्रीरामपूर नगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी वॉर्ड क्रमांक 2 मधील काझीबाबा रोडवरील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 70 गोवंशीय जनावरांची कातडी आणि मांसाचे तुकडे जप्त करण्यात आले.
.
कारवाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आणि नगर अभियंता सूर्यकांत गवळी यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जप्त करण्यात आलेली कातडी अकरम कुरेशी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये सापडली. कारवाईदरम्यान आरोपी अकरम कुरेशी फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याधिकारी घोलप यांनी स्पष्ट केले की श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम थांबणार नाही आणि अशा कारवाया सुरूच राहतील.