कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष नारायण हिंगणकर असे मयत शेतकऱ्याचे न
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळोदी येथील शेतकरी संतोष नारायण हिंगणकर (६०) यांना पाळोदी शिवारात तीन एकर शेत आहे. या शेतीवर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत होता. या शेतावर त्यांनी कळमनुरी येथील भारतीय स्टेट बँकेकडून एक लाख रुपयांचे पिककर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांनी खरीप हंगामात सोयाबीनचे पिक घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. तर रब्बी हंगामात चांगले उत्पन्न येईल अशी आशा होती. मात्र रब्बीमध्येही निराशाच झाली.
याप्रकारामुळे कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. शुक्रवारी ता. २८ दुपारी शेतात जाऊन येतो असे घरी सांगून ते शेताकडे निघाले होेते. रात्री उशीरा पर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. शेतात ते कुठेही दिसले नाही. त्यामुळे लगतच्या शेतातील विहीरी जवळ जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांची काठी आढळून आली. त्यामुळे संतोष यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत संतोष यांचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. त्यानंतर आज रामराव हिंगणकर यांनी दिलेल्या माहितीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार शेळके पुढील तपास करीत आहेत.