पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे.
.
पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात सॉफ्ट स्किल्स, वाहन कायदा, तंत्रज्ञान, इ-चलन यंत्राचा वापर, नागरिकांशी संवाद कौशल्य आणि अपघातग्रस्तांवरील तातडीचे उपचार यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सॉफ्ट स्किल संचालक, आरटीओ अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी आणि जहाँगीर रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश होता.
मुंबईप्रमाणे पुण्यातही वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची योजना आहे. सध्या या संस्थेसाठी जागेचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मते, हे प्रशिक्षण वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करेल.
