राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय घेणार असल्याचे कोकाट
.
या संदर्भात कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, अपील प्रकरण संपेपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळाली आहे आणि जामीन मिळाला आहे. दोन वर्षांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे, त्यावर न्यायालय उद्या निर्णय देणार आहे. त्यासंबंधी सरकारी वकील हे उद्या आपली बाजू मांडणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, नियमानुसार विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही. याविषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच या प्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, काँग्रेस नेत्यांवर अशा प्रकरणात यापूर्वी अवघ्या 24 तासांत कारवाई करण्यात आली होती असा आरोपही केला जात आहे. या संदर्भात आता न्यायालयाने कोकाटेंना दिलासा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक स्थित न्यायालयाने 1995 च्या एका प्रकरणात 2 वर्षांची कैद व 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कोकाटे बंधूंवर एक नव्हे तर चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींनुसार कोकाटे विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरतात. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्यावर केव्हा कारवाई करणार? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातील निर्णय न्यायालय उद्या घेणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.