भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. धनश्री नातू (पुणे) यांनी कथक नृत्य सादर
.
भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २३५ वा कार्यक्रम होता.रसिका गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे,ज्येष्ठ नृत्यगुरु सुचेता भिडे-चाफेकर,सुचित्रा दाते,निलीमा आध्ये,सौ.प्राजक्ता अत्रे या मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
सागरिका पटवर्धन यांच्या भरतनाटयम प्रस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘अर्धनारीश्वर ‘ या पारंपारिक रचना त्यांनी सादर केली.त्यानंतर शिव-शक्तीवरील मराठी पदम ‘म्हणती महादेव भोळा ‘ या नृत्य प्रस्तुतीने सांगता केली.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई ) यांनी ‘ जन्मभूमी वंदना ‘ या प्रस्तुतीने सादरीकरणास सुरुवात केली. कवी दिबाकर दास यांची ही रचना होती. यानंतर अभिनय प्रकारातील ‘द्रौपदी वस्त्रहरण ‘ ही नृत्य प्रस्तुती सादर केली. द्रौपदी वस्त्रहरणाची घटना, जिथे द्रौपदी आपल्या पाच पतींना आणि श्रीकृष्णाला विचारते की त्यांनी हे कसे होऊ दिले. हा प्रसंग आपल्या नृत्य प्रस्तुतीतून सादर केला.
धनश्री नातू यांनी कथक नृत्य प्रस्तुतीची सुरुवात गणेश वंदनाने केली.त्यानंतर ताल प्रस्तुतीमध्ये मध्य दृत झपताल,पारंपारिक रचना,कवित्त,अभिनय प्रस्तुती मध्ये ‘ दोहा ‘ ही रचना सादर केली. कवित्त ‘दक्ष यज्ञ ‘ या रचनेने कथक नृत्य प्रस्तुतीची सांगता केली.झेलम परांजपे यांनी अभंग प्रस्तुती मध्ये ‘संत चोखामेळा ‘ यांची ‘ जोहार मायबाप जोहार ‘,’ अबीर गुलाल ‘ या अप्रतिम सादरीकरणाने ‘ लक्ष्य ‘ कार्यक्रमाची सांगता झाली.