एका निलंबित नायब तहसीलदाराने थेट बारावीच्या परीक्षा केंद्रात बेकायदा घुसून आपल्या मुलास कॉपी पुरवल्याचे गुरुवारी उघडकीस आले. अनिल फक्कडराव तोरडमल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत कामात कसूर केल्याप्रकरणी ताेरडमल यास नाेव्
.
पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या जीवशास्त्र विषयाच्या पेपरला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. केंद्रात आलेल्या एका व्यक्तीबद्दल संशय असल्याची माहिती परीक्षा केंद्रसंचालक शिवाजी अंबादास दळे (३६) यांनी पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. गुट्टे यांना दिली. संशयिताची चौकशी केल्यानंतर, त्याने आपण नायब तहसीलदार असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा मुलगा बारावी परीक्षेला या केंद्रावर असल्याचेही स्पष्ट केले. नायब तहसीलदार तोरडमल हा यापूर्वी ११ फेब्रुवारीला पहिल्या दिवशी दिसला होता. त्या वेळी दळे यांना त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलो असे सांगितले होते. तसेच शासनाचे ओळखपत्र दाखवले होते. त्यावेळी तोरडमल एखाद्या पथकातील असावेत असा निष्कर्ष काढून त्यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र ११ फेब्रुवारी व २७ फेब्रुवारी रोजी अनिल फक्कडराव तोरडमल याने त्याच्या मुलाला कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने केंद्रात प्रवेश मिळवला. नेमणूक नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षेमध्ये होणारा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ मधील कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश
तो निलंबित नायब तहसीलदार अहिल्यानगर तालुक्यातील आहे. त्याचे नातेवाईक परीक्षेला होते. त्यामुळे तो नायब तहसीलदार तिकडे गेला होता. याप्रकरणात प्रांताधिकाऱ्यांना त्याच्यावर त्वरित कारवाई करून आवश्यकतेनुसार पोलिस केस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
बडतर्फ करण्याच्या सूचना
अशा लोकांना बडतर्फ करावे अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. त्याच्यावर फौजदारी दाखल करावी. राज्य कॉपीमुक्तझाले पाहिजे, अतिशय प्रभावीपणे कॉपीमुक्तीसाठी यंत्रणा राबवली. पण अनेक वर्षांपासून किडलेल्या व्यवस्थेत एखाद-दोन प्रकार घडतील, ते दुरुस्त होतील. – राधाकृष्ण विखे, पालकमंत्री.