गुन्हेगाराला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी पोलिस कोणत्याही टोकाला जातात. त्यात गुन्हेगाराचा कसा फायदा होतो याचे उदाहरण स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणात दिसून आले. स्वारगेट ठाण्याच्या पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्याएेवजी आरोपी दत्तात्रय गाडेसारख्
.
आता तीन किलोमीटर परिसरात ड्रोन तैनात करून गाडेला शोधले जात आहे. पीडितेने स्वारगेट पाेलिस ठाण्यात येऊन बलात्कार झाल्याची तक्रार देताच पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. गुन्हेगारांचे रेकाॅर्ड तपासत आरोपी दत्तात्रय गाडे असल्याचे निश्चितही केले. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती गुन्हेगार पकडण्याचे कौशल्य प्राप्त असलेल्या गुन्हे शाखेकडे देणे अपेक्षित होते. पण त्यांनी तसे केले नाही. आम्हीच आरोपी पकडतो, असे म्हणत श्रेय मिळवण्यासाठी स्वारगेट पथक तांत्रिक मार्गाने तपास करत आरोपीच्या गुणाट (ता. शिरूर) या गावी पोहोचले. त्यांनी तेथे दत्तात्रयच्या घरात शिरून त्याच्या सारख्याच दिसणाऱ्या त्याच्या भावालाच पकडले व त्याची चौकशी सुरू केली. काही वेळानंतर आपण चुकीचा व्यक्ती पकडल्याचे स्वारगेटच्या पोलिस पथकाला लक्षात आले. तोपर्यंत खरा आरोपी दत्तात्रय गाडेला ही माहिती कळाली आणि तो गावातील उसाच्या शेतातून पसार झाला. मग पोलिसांनी गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील तीन किलाेमीटरच्या क्षेत्रातील उसाच्या शेताची व संशयित परिसराची पाहणी दोन ड्रोनद्वारे सुरू केली. बुधवारी रात्री गावाबाहेर एका ज्येष्ठ महिलेस ताे पाणी पिण्यास आल्यावर दिसल्याने त्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. मात्र, सर्च ऑपरेशनमध्ये तो सापडला नाही.
गाडेच्या दहा मित्र, मैत्रिणीची चौकशी
आरोपी गाडेच्या शोधासाठी गुन्हे शाखा, स्वारगेट पोलिसांची १३ पथके तैनात आहेत. त्यांनी गाडेच्या दहा मित्र, मैत्रिणींची चौकशी केली. गाडेच्या आई-वडील, भावालाही स्वारगेट पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. ज्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला ती बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.
सुरक्षेबाबत परिवहन महामंडळ व पाेलिसांची टाेलवाटाेलवी
स्वारगेट स्थानकात खासगी एजंट, तृतीयपंथी आत येऊन प्रवासी व कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. कारवाई करण्यासाठी स्वारगेट आगाराने २२ फेब्रुवारीला पोलिसांना पत्र दिले. मात्र, हे पत्र स्थानकाकडून १०० मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट पाेलिसांना तरुणीच्या बलात्कार घटनेनंतर २५ फेब्रुवारी राेजी प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ व पाेलिसांची एकमेकांवर टाेलवाटाेलवी सुरू आहे.
आरोपीवर चार पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे पाच गुन्हे दाखल
दत्तात्रयवर शिक्रापूर, शिरूर, काेतवाली, सुपा पाेलिस ठाण्यात जबरी चाेरीचे पाच तर स्वारगेट पाेलिस ठाण्यात माेबाइल चाेरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ताे पाेलिस, कंडक्टर असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत अनेक दिवस फिरत होता, अशीही चर्चा आहे. आरोपीचे गुन्हे ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने शहरी पोलिसांना त्याची माहिती नव्हती, असा दावा केला जात आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने मागवला पोलिसांकडे अहवाल
तरुणीवर ज्या बसमध्ये अत्याचार झाला ती बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. बसचालकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी तपास अहवाल, फिर्यादीची प्रत तीन दिवसांत सादर करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे सांगण्यात येत आहे.