कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.
.
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, गृहोपयोगी वस्तू, शोभिवंत फुलांची झाडे, अशा विविधांगी स्टॉल्सचा समावेश होता. स्टॉल्सधारकांनी पाच दिवसात सुमारे ७० लाख रुपयांचे व्यवहार पूर्ण केले, असे आयोजकांचे म्हणणे आहे. राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले होते. माजी कृषी मंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार प्रवीण तायडे आदी लोकप्रतिनिधी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे, हे ओळखून पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल पथनाट्याच्या माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली.
रोडगे, झुणका भाकरीला पसंती धनलक्ष्मी महिला बचत गट व महात्मा ज्योतिबा फुले महिला बचत गट या दोन स्टॉलवर रोडगे, झुणका भाकर या पदार्थांची चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्वाभाविकच या दोन बचतगटांची उलाढालही मोठी आहे. या प्रदर्शनीमुळे खऱ्या अर्थाने शेतकरी ते ग्राहक संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली, असे आत्माच्या जिल्हा समन्वयक अर्चना निस्ताने यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. यावेळी ग्राहकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.