रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत | इतिहास, राज्याभिषेक आणि पर्यटन मार्गदर्शन

रायगड किल्ल्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, जिजाऊ राजवाडा, महादरवाजा, रोपवे आणि पर्यटन माहिती मराठीत जाणून घ्या.

माझी मराठी
माझी मराठी संपादकीय टीम
12 वाचने
रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत | इतिहास, राज्याभिषेक आणि पर्यटन मार्गदर्शन


रायगड किल्ल्याची ओळख


रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील अत्यंत महत्वपूर्ण किल्ला मानला जातो. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये रायगडाला एक वेगळे आणि विशेष स्थान आहे.रायगड किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १०० एकर असून पायथ्यापासून त्याची उंची जवळपास १३७५ फूट आहे. समुद्रसपाटीपासून रायगडाची उंची सुमारे २८५१ फूट इतकी आहे. संपूर्ण रायगड फिरण्यासाठी दोन दिवससुद्धा कमी पडतात असे म्हटले जाते.

रायगड किल्ला चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेला असला तरी कोणतीही पर्वतरांग थेट या गडाला जोडलेली नाही. त्यामुळे हा किल्ला मंदिराच्या कळसासारखा स्वतंत्र आणि भव्य दिसतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये डौलाने उभा असलेला हा गड प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतो.

रायगडाला इतिहासात अनेक नावांनी ओळखले जाते. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशी त्याची विविध नावे प्रसिद्ध आहेत. अनेक परकीय सत्ता या किल्ल्यावर राज्य करून गेल्या आहेत.



रायरी ते रायगड : इतिहास


रायगड किल्ल्याची स्थापना बाराव्या शतकात झाली होती. सुरुवातीला हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता. यादव साम्राज्यानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. त्या काळात जावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाची चाकरी करत होते आणि रायरीचा डोंगर त्यांच्या ताब्यात होता.त्यावेळी या डोंगराला ‘रायरी’ या नावाने ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रथम या डोंगराकडे पाहिले, तेव्हाच त्यांनी हा डोंगर स्वराज्यात सामील करण्याचा निर्णय घेतला होता. रायरीचा भौगोलिक आकार आणि त्याची सुरक्षित रचना पाहून महाराजांना या गडाचे महत्व समजले होते.शिवाजी महाराजांनी राजगडावरून चंद्रराव मोरे यांना पत्र पाठवून स्वराज्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र मोरे यांनी अत्यंत उर्मटपणे उत्तर देत जावळीचा विचारही मनात आणू नका असे सांगितले. हे ऐकल्यानंतर महाराजांनी मोऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.


शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कसा जिंकला?


छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या १५४ मावळ्यांसह जावळी प्रांतावर हल्ला केला. या लढाईमध्ये सूर्याजी काकडे यांच्या हस्ते हनुमंतराव मोरे मारले गेले. महाराजांच्या पराक्रमामुळे जावळी प्रांतावर स्वराज्याचा विजय झाला.सन १५ मे १६५६ रोजी चंद्रराव मोरे यांनी रायरीवर शिवाजी महाराजांना शरणागती पत्करली. त्यानंतर रायरीचा डोंगर स्वराज्याच्या ताब्यात आला. हा विजय स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.

रायरी जिंकल्यानंतर महाराजांनी या गडाला भविष्यातील राजधानी बनवण्याचे ठरवले. रायरीचा डोंगर केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच नव्हे तर प्रशासनासाठीही योग्य असल्याचे महाराजांनी ओळखले होते. पुढे याच रायरीचे नाव बदलून ‘रायगड’ असे ठेवण्यात आले.


रायगड किल्ल्याची बांधणी


रायगड स्वराज्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची भव्य पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी आपल्या विश्वासू सरदार हिरोजी इंदोलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.

महाराजांनी गडावर राजवाडा, सदर, पाहुण्यांसाठी निवासस्थान आणि जगदीश्वर मंदिर अशी काही महत्वाची बांधकामे उभारण्याची सूचना केली होती. मात्र हिरोजी इंदोलकर यांनी आपल्या कल्पकतेने रायगडाला अभेद्य आणि भव्य स्वरूप दिले.हिरोजींनी स्वतःची जमीन विकून मिळालेल्या पैशातून रायगडाच्या बांधकामासाठी मदत केली होती. त्यांनी गडावर सुमारे ३५० इमारती, १४ तलाव आणि ८४ पाण्याच्या टाक्या बांधल्या. या भव्य कामासाठी जवळपास १४ वर्षांचा कालावधी लागला.

सन ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता. याच दिवसापासून रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी बनला.