प्रतापगड किल्ल्याची तटबंदी बांधण्याआगोदर हे एक डोंगर होते. हे डोंगर विजापुराचे आदिलशाही याच्या ताब्यात होते. आदिलशहा म्हणजे कर्नाटकाची सीमारेषा. आदिलशाचा सुभेदार चंद्रराव मोरे हे एक मराठा हिंदू होते. एक हिंदू असूनही ते आदिलशाहीसाठी काम करत असतं. शिवाजी महाराजांनी प्रथम चंद्रराव मोरे यांच्याशी वार्ता केली कि दोघे मिळून आपण हिंदवी राज्य स्थापन करू आणि स्वराज्य वाढवू पण चंद्रराव मोरे यांनी ते साफ फेटाळून लावले. त्यामुळे सन १६५५ साली छत्रपती शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करावी लागली. महाराजांनी मोरे यांना लढा दिला आणि त्यांस ठार करून जावळी प्रांत काबीज केले. जेव्हा जावळी प्रदेश पुर्णपणे शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तेव्हा आदिलशहा पूर्ण हादरला. आदिलशहानी विजापूरमध्ये खूप मोठा दरबार भरवला. त्या दरबारात बडीबेगम साहेबांनी पैजेचा विडा ठेवला “जो कोई शिवाजी को जिंदा या मुर्दा पकडके लायेगा मे उसे बडी जहांगीर दुंगी“. या पैजेचा विडा विजापूरचा बडा सरदार अफझल खान यानी उचलला आणि तो चाळीस हजार सैन्यसह छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यास प्रतापगडाच्या दिशेला निघाला. शिवाजी महाराजांनी तो डोंगर ताब्यात घेतल्यावर डोंगरावर किल्ला बांधणीचे काम त्यांनी अष्टप्रधान मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदोलकर यांना दिले. सन १६५६ साली किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. १६५६ ते १६५८ या कालावधी मध्ये आवघ्या दोन वर्षात किल्ल्याची पाच किलोमीटरची भिंत बांधून टाकली. किल्ल्याचे बांधकाम असे केले होते कि, किल्ल्याचे प्रवेशद्वार सहासा लांबून दिसून येत नाही. किल्ल्याच्या खालून एक जुनी पाय वाट गेली आहे, ही पासष्ट किलोमीटरची पायवाट महाराज रायगडावरून प्रतापगडावर येण्यासाठी वापरत असे.
अफझल खान हा क्रुर, दिसायला धिप्पाट आणि उंचीला साडे सात फुटांचा होता. एक मोठ्या हत्तीला लोळवू शकतो एवढे बळ त्याच्या अंगात होते. तो विजापूर, पंढरपूर, तुळजापूर करत गावोच्या गावे लुटत तुळजापूरचे मंदिर उद्ध्वस्त करत तो पाचगणीच्या खाली वाई पर्यंत पोहोचला. अफझल खान हा वाईचा बारा वर्ष सुभेदार होता, त्याला वाई या प्रदेशाची पूर्ण माहिती होती. अफजलखान याने त्याच्या निष्टावंत वकिल कृष्णाजी वास्कर कुलकर्णी यांना गडावर पाठवले आणि शिवाजी महाराजांन सोबत चर्चा करून भेटीचे नियोजन ठरविले. चाळीस हजार सैन्यापैकी अफझल खान फक्त बारा हजार सैन्य घेऊन तो जावळीच्या खोऱ्यातून प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. खानाच्या भेटीसाठी गडाच्या खाली मोठा शामियाना उभारण्यात आला होता, या शामियानाला मणी, माणिक, हिरे, मोत्यांनी आत आणि बाहेरून सजवले होते. खानासाठी शामियाना अश्या ठिकाणी उभारण्यात होता कि, गडवरून शामियानावर पूर्णपणे नजर ठेवता येऊ शकते. शिवाजी महाराज खानच्या भेटीसाठी आपल्या अंगरक्षक जीवा महाले यांच्यासह गडावरून शामियानाकडे निघाले, अफझल खानाला पालखीत बसवून शामियान्यात आधीच आणले होते. खान शिवाजी महाराजांची आतुरतेने वाट पाहत होता, खान दगाफटका करणार हे सर्वाना माहित होते तसे शिवाजी महाराज तयारीनिशी भेटीसाठी गेले होते. खानाची उंची साडेसात फुट आणि महाराजांची उंची साडेपाच फुट. खान जेव्हा महाराजांना आलिंगन देण्यासाठी पुढे आला, तेव्हा त्याने आलिंगन देण्याचे नाटक करून महाराजांना डाव्या बगलेत जोरात आवळले. खानांनी उजव्या हातानी कट्यार काढून महाराजांच्या पाठीमागुन वार करण्यास सुरुवात केली. महाराजांनी वर घातलेला अंगरखा खानच्या दोन वारांनी फाटला गेला पण आत चिलखत घातल्यामुळे महाराजांना कोणतीही इजा झाली नाही. दोन्ही वार झेलल्यानंतर राजांनी आपल्या हातातील दोन्ही वाघनखांनी खानाच्या पोटावर ताकदीनिशी जोरात मारले आणि खानाचे पोट फाडून सगळी आतडे बाहेर काढून टाकली. अफझल खानच पोट फाडल्यावर खान जोरजोरात “दगा दगा” अस ओरडू लागला. तेव्हा बाहेर असलेला खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याला कळाले तो तलवार काढून शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास गेला तेव्हा तिथे उभा असलेला जीवा महाले यांनी दांडपट्ट्याने सय्यद बंडाला उभा चिरला. मराठी मध्ये एक म्हण आहे “होता जीवा म्हणून वाचला शिवा”. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर राजांना फार मोठा प्रताप मिळाला, मराठीत विजयाला प्रताप अस म्हणतात म्हणून या किल्ल्याला प्रतापगड अस नाव ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात प्रतापगडची लढाई १० नोव्हेंबर १६५९ रोजी या किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली झाली. अफजलखानचा मृतदेह जेथे शामियाना उभारला होता त्याच ठिकाणी त्याला दफन करून कबर बांधण्यात आली असे सांगण्यात येते. प्रतापगडच्या लढाईनंतर अफझल टॉवरचे बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले जाते.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० मीटर उंचीवर आहे. प्रतापगड हा किल्ला अवकाशातून पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. महाबळेश्वर या हिलस्टेशनपासून हा किल्ला केवळ २४ किमोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याच्या आतच दुसरा किल्ला आहे. दोन भागांमध्ये विभागला गेलेला दुसरा किल्ला ३२० मीटर लांब आणि ११० मीटर रूंद आहे. तर वरचा किल्ला १८० मीटर लांब आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा काळ दगड हा त्याच डोंगराच्या खाणीतून काढले होते, हे दगड काढत असताना तिथे पाण्याचा झरा लागला आणि तिथे पाण्याचे तळे बांधण्यात आले. गडावर एकुण चार तलाव आहेत, वर बालेकिल्ल्यावर दोन आणि खालच्या किल्ल्यात दोन. किल्ल्याचे महाद्वार शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. गडाच्या दक्षिणेस टेहळणी बुरुज आहे. या बुरुजातून शत्रूवर लक्ष ठेवता येत असे. तेथून मावळे वर असणाऱ्या नगारखान्याला इशारा देत असे आणि नगारखान्यातून नगार वाजवून सर्व मावळ्यांना संकटकाळी सतर्क करत असत. या बुरुजाला शिवप्रताप बुरुज असे दुसरे नाव पडले कारण अफझल खानाचा वध केल्यानंतर संभाजी कावजी कोंढाळकर यांनी अफझल खानाचे मुंडके या बुरुजावर टांगून ठेवले होते.
गडाच्या अडीचशे पायऱ्या चढल्यानंतर डावीकडे श्री भवानी मातेच मंदिर लागते. महाराजांनी देवीच्या मूर्तीसाठी शिळा नेपाळच्या गंडकी नदीतून मागवले होते. ही मूर्ती राजगडला पुणे जिल्ह्यातील मूर्तिकार बंबाजी नाईक पानसरे यांनी घडवली. देवीची स्थापना सन १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व स्वराज्याचे चौथे सरसेनापती आणि महाराजांचे सक्खे मेहुणे श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. भवानी मंदिराच्या पाठीमागे भवानी बुरुज आहे. मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीचे मुख दक्षिणेकडे आहे आणि शेपटी डोक्यावरून वळण दिलेली आहे. या हनुमानाच्या मूर्तीस विरप्रताप हनुमान असेही म्हणतात. पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो, या दरवाजाची रचना गोमुख पद्धतीची आहे. बालेकिल्ल्यातून आत गेल्यावर डावीकडे श्री केदारेश्वराचे मंदिर लागते. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे. मंदिराच्या समोरील जागेत महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा दरबार भरायचा आणि प्रमुख दरबार हा राज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर भरायचा. या दरबारामध्ये प्रमुख मंत्र्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतले जात असे. अफझल खानाच्या भेटीअगोदर महाराजांनी पहाटे या मंदिरात रूद्राभिषेक करून दरबारात विचार्मय करून ते खानाच्या भेटीस गेले. केदारेश्वर मंदिरालगत केदारेश्वर बुरुज आहे. या बुरुजावरून संपुर्ण रायगड जिल्हा दिसतो.
केदारेश्वर बुरुजावरून पुढे चालत गेल्यास कडेलोट हे ठिकाण आहे. कडेलोटाची उंची सुमारे ३५४३ फुट आहे. कडेलोटाच्या आतील बाजूस खाली उतरल्यास समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य (Bronze) या धातूचा अश्वरूप पुतळा आहे, त्या ठिकाणी राजांचा राहण्याचा राजवाडा होता तो ब्रिटिशांनी उध्वस्त केला. यातील मौल्यवान वस्तु ब्रिटिश ब्रिटनला घेऊन गेले त्यात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही सुद्धा त्यांनी नेली आहे. भवानी तलवार हि लंडनच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे. राजांच्या आठवणीसाठी त्या ठिकाणी ३० नोव्हेंबर १९५७ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण झाले. हा पुतळा मुंबईचे रामचंद्र पांडुरंग कामत (विलेपार्ले) यांनी बनविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव कृष्णा होते, या पुतळ्याचे घोडीसकट पूर्ण वजन साडे चार हजार किलो आहे. या मूर्तीची उंची घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत सोळा फुटांची उंची आहे तर मूर्तीच्या पायाची उंची वीस फुट आहे असे एकुण छत्तीस फुटाची मूर्ती आहे, पुतळ्याच्या आजूबाजूला तोफा ठेवल्या आहेत. पुतळ्याची संपुर्ण देखभाल सातारा जिल्हा परिषदेकडून केली जाते. त्याच वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभरोसी गावातून गडापर्यंत एक रस्ता तयार केला गेला. एक अतिथीगृह आणि एक किल्ल्याच्या आत राष्ट्रीय उद्यान सन १९६० मध्ये बांधण्यात आले होते. सध्या हा किल्ला उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत.
Recommended for you
Breaking Down the Elements of a Masterpiece Painting
The Revival of Classical Art in a Digital Age
Must-See Art Exhibitions Around the World This Year
The Revival of Classical Art in a Digital Age